'विनावर्गणी' लोकसहभागातून श्रीगोंद्यात साजरी होणार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती!


प्रशासक न्यूज,दि.११मे२०२६

छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती श्रीगोंदा शहरात दि १४ व १५ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात आणि विनावर्गणी लोकसहभागातून साजरी करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, श्रीगोंदा यांच्या वतीने यासाठी भव्य स्वरूपात नियोजन करण्यात आले असून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजी महाराज चौक, श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा, सायकल स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची तसेच विविध सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यासोबतच युवकांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, त्याग व राष्ट्रनिष्ठ विचार समाजापर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थी सत्कार, “शंभू शौर्य” व्याख्यान तसेच शाहिरी पोवाडा यांसारख्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तकांच्या तब्बल ११०० प्रती नागरिकांना मोफत वितरित करण्यात येणार आहेत.

संपूर्ण उत्सव विनावर्गणी आणि लोकसहभागातून साजरा होत असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी सौजन्य स्वरूपात सहकार्य करत उत्सवात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत श्रीगोंदा येथील नागरिक संदीप बजरंग घोडके यांच्या किडनी प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदतही करण्यात आली आहे.

सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी या जयंती उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला असून श्रीगोंदा शहरात भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी समितीचे अध्यक्ष राजू दादा गोरे, उपाध्यक्ष विजय डहाळे, कोअर कमिटी सदस्य बालू दादा मखरे, दिलीप लबडे, शामभाऊ जरे, दीपक मखरे, आरडे मेजर आदी उपस्थित होते.
'विनावर्गणी' लोकसहभागातून श्रीगोंद्यात साजरी होणार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती! 'विनावर्गणी' लोकसहभागातून श्रीगोंद्यात साजरी होणार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती! Reviewed by Prashasak on मे ११, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.