प्रशासक न्यूज,दि.१९जानेवारी २०२५
तरुण मुलाचा अपघातात मृत्यू होऊन एक महिना उलटूनसुद्धा अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरल्यामुळे श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि मयत मुलाला न्याय मिळावा या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मयत मुलाच्या कुटुंबीयांवरच पैसे मागितल्याचा आरोप करणारे वक्तव्य केल्यामुळे श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्याविरोधात ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाल्याचे आज पहायला मिळाले स्वतः पोलीस उपाधीक्षकांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या वादावर पडदा पडला
हिरडगाव येथील कुणाल शांतीलाल दरेकर या तरुणाचा मागच्या महिन्यात हिरडगाव फाट्या नजिक अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता सदर अपघाताची घटना होऊन एक महिना उलटूनही अजून सुद्धा श्रीगोंदा पोलिसांना धडक दिलेल्या वाहनाचा तपास लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आणि कुणाल दरेकर याला न्याय मिळावा या मागणीसाठी आज हिरडगाव येथील ग्रामस्थ आणि मयत कुणालचे कुटुंबीय श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले होते उपोषणादरम्यान एका पदाधिकाऱ्याने श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना फोन वरून संपर्क साधत संबंधित प्रकरणाबाबत विचारणा केली त्यावेळी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी मयत कुणाल दरेकर याच्या कुटुंबातील लोक ट्रॅक्टर वाल्याकडे पैशांची मागणी करत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या या वक्तव्यावर उपस्थित उपोषणकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला त्यांच्या वक्तव्यानंतर उपोषणकर्ते चांगलेच आक्रमक झाले
*तर माझी जमीन विकून पैसे देतो पण न्याय द्या...*
मयत कुणाल दरेकर याच्या वडिलांनी पोलीस निरीक्षकांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली माझा एकुलता एक मुलगा गेला आहे त्याचा ज्या वाहनाने अपघात झाला त्याचा पोलिसांना शोध लागत नाही पोलीस म्यानेज झाले आहेत पोलिसांना पैसे लागत असतील तर माझी जमीन विकून मी त्यांना पैसे देतो पण माझ्या मुलाला न्याय द्या अशी हतबल आणि संतप्त प्रतिक्रिया शांतीलाल दरेकर यांनी व्यक्त केली
यावेळी मयत कुणालची आई आणि आजी यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते पोलीस कर्मचाऱ्याचा रात्रीच्या वेळेस अपघात झाला होता त्यावेळी अपघातातले वाहन पोलिसांनी लगेच शोधून काढले मग आमच्या मुलाचा दिवसा अपघात झालेला असूनसुद्धा पोलिसांना ते वाहन कसे काय सापडत नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला
पोलीस निरीक्षकांनी केलेल्या वक्तव्याचा उपस्थित सर्वांनीच तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत ज्या तरुणाचा अपघातात जीव गेला त्या वाहनाचा शोध घेऊन तपास करण्या ऐवजी उलट मयताच्या कुटुंबियांवर पोलीस निरीक्षकांनी आरोप केल्यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले तसेच पोलीस निरीक्षक शिंदे यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली त्या बाबत देखील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली पोलीस स्टेशनचे प्रमुख असून सुद्धा ते आंदोलनाकडे फिरकत नाहीत याबाबतही उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली
सहायक पोलीस निरीक्षक गणेश आहिरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका उपोषण कर्त्यांनी घेतली
यावेळी बोलताना सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि पो नि शिंदे यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली
पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे श्रीगोंदा तालुक्याला संरक्षण देण्यात असमर्थ ठरल्याचा आरोप राजेंद्र म्हस्के यांनी केला तसेच त्यांनी बदली करून लवकरात लवकर इथून निघून जावे असे संतप्त मत म्हस्के यांनी व्यक्त केले
मिलिंद दरेकर,प्रशांत दरेकर यांनी सुद्धा मयत कुणालच्या अपघाताची चौकशी न झाल्यास २६जानेवारीला ध्वजारोहणाच्या वेळी तहसील कार्यलयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला अनिल ठवाळ यांनी पोलीस निरीक्षकांच्या वक्तव्याचा निषेध करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली यावेळी गंगाराम दरेकर,संतोष दरेकर यांची भाषणे झाली
आंदोलनस्थळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे,जेष्ठ नेते घनश्याम आण्णा शेलार यांनी भेट देत पोलीस निरीक्षकांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत उपोषणकर्त्यांना न्याय देण्याची मागणी केली
*पोलीस अधीक्षकांकडून दिलगिरी...*
मुलाला न्याय मागणाऱ्या कुटुंबावरच पैसे मागितल्याचा आरोप केल्यामुळे उपोषणस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस उपाधीक्षक आल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली त्यानंतर कर्जत पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी उपोषणस्थळी येत उपोषणकर्त्यांशी संवाद साधला पो नि शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत स्वतः उपाधीक्षक लोखंडे यांनी दिलगिरी व्यक्त केली तसेच मयत कुणालच्या अपघाताच्या तपासात पोलिसांकडून काही उणीवा राहिल्याची कबुली देत या प्रकरणाचा तपास स पोनि आहिरे यांच्याकडे देत येत्या आठ दिवसात अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध घेण्याचे लेखी आश्वासन आंदोलन कर्त्यांना दिले त्यानंतर तहसीलदार सचिन डोंगरे आणि उपाधीक्षक लोखंडे यांच्या हस्ते मयत कुणालच्या आई वडिलांनी पाणी घेत उपोषण मागे घेतले
येत्या २६ जानेवारीच्या आत सदर प्रकरणाचा तपास न झाल्यास हिरडगाव सह आसपासच्या गावातील लोक एकत्र येऊन तहसील कार्यालयासमोर उपोषण करतील असा ईशारा पोलिसांना दिल्यामुळे आता तरी मयत कुणाल ला न्याय मिळणार का असा सवाल उपस्थित होत आहे
पोलीस निरीक्षकांच्या "त्या" वक्तव्यानंतर ग्रामस्थांचा संताप...!
Reviewed by Prashasak
on
जानेवारी १९, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
जानेवारी १९, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: