काळोखातील जगण्याला द्या प्रकाशाचं दान ! जागतिक दृष्टी दान दिवस विशेष-


प्रशासक न्यूज, दि.१०जून २०२४

आज १० जून हा दिवस स्वर्गीय डॉक्टर भालचंद्र दृष्टी दान दिवस म्हणून साजरा करतात.या दिनानिमित्त दौंड येथील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ व नेत्रदान क्षेत्रात उल्लेखनीय कामागिरी करणारे डॉ प्रेमकुमार भट्टड यांच्याशी साधलेला विशेष संवाद---

नेत्रदान संबंधी संमती पत्र भरून देणाऱ्यांची संख्या वाढत आहे परंतु प्रत्यक्षात नेत्रदान करण्याचे प्रमाण अतिशय संथ गतीने वाढत आहे.प्रत्येकाने योगदान दिल्यास नेत्रदानाच्या प्रमाणात निश्चितचं वाढ होईल,असा विश्वास दौंड येथील महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे सदस्य डॉक्टर प्रेम कुमार भट्टड यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले,"दृष्टी अभावी ज्यांचे जीवन अंधकारमय आहे अशांचे जीवन आपल्या नेत्रदानामुळे प्रकाशमान होणार असल्याने नेत्रदानाचा संकल्प व त्यासाठी आवश्यक व्यवस्था करणे हिताचे ठरेल.संमती पत्र देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या शोकमग्न कुटुंबास नेत्रदान करण्याची नुसती आठवण करून दिली तर काहींना राग येतो;परंतु त्या उलट काही कुटुंबे कर्तव्य भावनेतून नेत्रदानास प्राथमिकता देतात,असे दोन टोकांचे चित्र अनुभवास मिळत आहे.

प्रत्येक कुटुंबाने नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा आणि आपल्या नातेवाईक व परिचितांना देखील त्यासाठी प्रवृत्त करावे अशी विनंती, नेत्रतज्ञ डॉ.प्रेम कुमार भट्टड यांनी केली.

*नेत्रदान करणा-याची जबाबदारी-*
नेत्रदानाचे संमती पत्र भरून दिल्या बाबतची माहिती कुटुंबीय आणि फॅमिली डॉक्टरांना देणे.

*नातेवाईकांची जबाबदारी-*
-मृत्यूनंतर मृत व्यक्तीचे डोळे त्वरित बंद करावेत.
-नेत्रदान करावयाच्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती तातडीने जवळच्या नेत्रतज्ञ किंवा नेत्र पेढीस कळवावी.
-डोळ्यांवर स्वच्छ,थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा कापूस ठेवावा.
-मृताच्या डोक्याखाली उशी ठेवावी.
*नेत्रदान कोण करू शकतो ?*
-वय,लिंग,जात नेत्रदानाच्या आड येत नाही.
-मधुमेह रक्तदाब असलेल्या व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात.
-मोतीबिंदू,मोती बिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात.

*नेत्रदान कोण करू शकत नाही?*
-एड्स,धनुर्वाण,कावीळ,
श्वानदंश,गुप्तरोग,कॅन्सर किंवा विषाणूजन्य आजारामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे नेत्रदान स्वीकारले जात नाही.
-नेत्रदान करणाऱ्या मृत व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेऊन आजारांबाबत खात्री केली जाते .


काळोखातील जगण्याला द्या प्रकाशाचं दान ! जागतिक दृष्टी दान दिवस विशेष- काळोखातील जगण्याला द्या प्रकाशाचं दान ! जागतिक दृष्टी दान दिवस विशेष- Reviewed by Prashasak on जून १०, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.