'शांत श्रीगोंदा'साठी 'ठेंगे' ॲक्शन मोडमध्ये; पहिली मोठी कारवाई...


प्रशासक न्यूज |दि.३ जुलै २०२६

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर श्रीगोंदा पोलिसांचा धडक बडगा; परवानगीशिवाय डीजे वाजवणाऱ्यावर गुन्हा दाखल

श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध पातळ्यांवर कठोर उपाययोजना सुरू केल्या असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक, शाळा-महाविद्यालय परिसरातील टवाळखोर आणि न्यायालयात हजर न राहणाऱ्या आरोपींवरील कारवाईनंतर आता बेकायदेशीर डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे
मोठ्या आवाजातील डीजेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनीमर्यादेचे पालन बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे

याच मोहिमेअंतर्गत चांडगाव (ता. श्रीगोंदा) येथील यश अरुण गवळी (वय २०) याच्याविरुद्ध परवानगीशिवाय आणि निर्धारित मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

तपासादरम्यान अनेक ठिकाणी रात्री १० नंतरही मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. संबंधित कार्यक्रमासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे डीजे साऊंड सिस्टीम व इतर साहित्य जागीच जप्त करण्यात आले. संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, डीजेसाठी वापरण्यात आलेल्या वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल (मॉडिफिकेशन) केल्याप्रकरणी RTO कडेही पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

महाराष्ट्रात यापूर्वी डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे गंभीर आरोग्यविषयक घटना घडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, तसेच आवश्यक परवानगी घेऊनच कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.

नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी ११२ हेल्पलाईन वर तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
'शांत श्रीगोंदा'साठी 'ठेंगे' ॲक्शन मोडमध्ये; पहिली मोठी कारवाई... 'शांत श्रीगोंदा'साठी 'ठेंगे' ॲक्शन मोडमध्ये; पहिली मोठी कारवाई... Reviewed by Prashasak on जुलै ०३, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.