'भक्तीचा' महासागर पंढरीकडे! भक्ती,बंधुभाव आणि सलोख्याचा संदेश देत १५ जुलैला होणार प्रस्थान..!


प्रशासक न्यूज,दि.९ जुलै २०२६

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे यंदा दि.१५ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. समाजात शांतता, बंधुभाव आणि भक्तीचा संदेश देणारा हा पालखी सोहळा गेल्या चार वर्षांपासून अविरतपणे सुरू असून, यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.

यावर्षीच्या पालखी सोहळ्यात सुमारे तीन हजारांहून अधिक वारकरी व भाविक शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होणार आहेत. यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात रथाला खांदा देणारी (रथ ओढणारी) सुप्रसिद्ध बैलजोडी याही पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे. या बैलजोडीचे मानकरी होण्याचा मान कृषी अधिकारी संदीप बोदगे यांना सलग चौथ्या वर्षी लाभला आहे.

असा असेल पालखीचा मार्ग...
भक्तीच्या गजरात निघणारी पालखी पुढील गावांमध्ये मुक्काम करत पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.

शेडगाव
खेड
भिगवण
पळसदेव
इंदापूर
बावडा
खंडाळी
तोंडले
पंढरपूर (अंतिम टप्पा)

वारकऱ्यांच्या आरोग्य, निवास आणि सोयीसुविधांचा विचार करून पालखी सोहळा समितीने संपूर्ण मार्गावर पिण्यासाठी शुद्ध फिल्टर पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच, मुक्कामाच्या ठिकाणी प्रशस्त मंगल कार्यालयांची सोय करण्यात आली असून, पंढरपूर येथेही भाविकांच्या निवासासाठी सर्व सुविधांनी युक्त भव्य मंगल कार्यालय आरक्षित करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे सर्वात मोठे आध्यात्मिक आकर्षण म्हणजे पंढरपूर येथे संत शेख महंमद महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची होणारी पावन भेट. हा अद्वितीय सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी मोठ्या उत्सुकतेने सहभागी होत आहेत.

पालखी सोहळा समितीच्या वतीने महाराष्ट्रभरातील भाविक आणि वारकऱ्यांना या पवित्र सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन विठ्ठल नामाचा गजर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
'भक्तीचा' महासागर पंढरीकडे! भक्ती,बंधुभाव आणि सलोख्याचा संदेश देत १५ जुलैला होणार प्रस्थान..! 'भक्तीचा' महासागर पंढरीकडे! भक्ती,बंधुभाव आणि सलोख्याचा संदेश देत १५ जुलैला होणार प्रस्थान..! Reviewed by Prashasak on जुलै ०९, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.