'कायद्याचे' रक्षकच नियमभंगाच्या भोवऱ्यात?प्रसिद्धीच्या नादात पीडीत तरुणीची ओळख जाहीर...श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!

(AI इमेज)
प्रशासक न्यूज,दि.३जून२०२६

तरुणीचा विनयभंग आणि मारहाण झालेल्या प्रकरणात आरोपीना झालेल्या शिक्षेची माहिती देणारे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करताना श्रीगोंदा पोलिसांनी या प्रकरणातील फिर्यादी असलेल्या पीडित तरुणीची ओळख जाहीर केल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून प्रसिद्धीच्या नादात श्रीगोंदा पोलीसांनी नियम पायदळी तुडवत पीडितेची ओळख जाहीर केल्यामुळे पोलिसांवरच कारवाईची मागणी होत आहे विशेष म्हणजे पोलीसांकडून हे प्रसिद्धी पत्रक सोशल मीडिया ग्रुपवर टाकण्यात आले आहे

२०१९ मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथे शेतीच्या वादातून घडलेल्या एका मारहाण व तरुणीच्या विनयभंग प्रकरणात श्रीगोंदा न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत नुकतीच शिक्षा सुनावली आहे. मात्र या प्रकरणाची माहिती देताना श्रीगोंदा पोलीस स्टेशनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.

पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याने हे प्रसिद्धी पत्रक सोशल मीडिया ग्रुपवर प्रसारित केले असून या पत्रकात विनयभंग झालेल्या पीडित तरुणीचे नाव व गावाचा उल्लेख करत तिची ओळख जाहीर करण्यात आली आहे. कायद्यानुसार विनयभंग,लैंगिक अत्याचार अथवा महिलांवरील अशा संवेदनशील गुन्ह्यांमध्ये पीडितेची ओळख गोपनीय ठेवणे बंधनकारक असताना सुद्धा पीडित तरुणीची माहिती सार्वजनिक झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे हे प्रसिद्धी पत्रक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या सहीने जारी करण्यात आले आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकारामुळे श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अश्या प्रकारे विनयभंग प्रकरणात पीडित फिर्यादी महिलेची ओळख जाहीर करणे हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे असून हा गंभीर प्रकार असल्याचे मत विधी तज्ञांनी व्यक्त केले आहे त्यामुळे या प्रकरणात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे 










'कायद्याचे' रक्षकच नियमभंगाच्या भोवऱ्यात?प्रसिद्धीच्या नादात पीडीत तरुणीची ओळख जाहीर...श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह! 'कायद्याचे' रक्षकच नियमभंगाच्या भोवऱ्यात?प्रसिद्धीच्या नादात पीडीत तरुणीची ओळख जाहीर...श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह! Reviewed by Prashasak on जून ०३, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.