काँग्रेस लोकसभेच्या दोन्ही जागा पूर्ण ताकदीने लढवणार:जिल्हाध्यक्षांचे प्रतिपादन


प्रशासक न्यूज,दि.९ऑगस्ट

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली असून त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्हा काँग्रेस माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाची निवडणूक समर्थपणे लढविण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नागवडे व काळे यांनी म्हटले आहे की , आगामी लोकसभा निवडणूक सक्षमपणे लढविण्याचे अनुषंगाने निवडणुकीचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील तालुका वाईज आढावा घेण्याचे दृष्टीने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार 13 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता शासकीय विश्राम गृह संगमनेर येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली असून त्याच दिवशी दुपारी तीन वाजता अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मेघनंद लॉन्स, मनमाड रोड, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश महासचिव वीरेंद्र कराड, तसेच सचिव ज्ञानेश्वर गायकवाड हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे संबंधित मतदार संघातील आमदार, माजी आमदार, माजी खासदार, प्रदेश पदाधिकारी, आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका नगरपंचायतीचे आजी माजी सदस्य, ब्लॉक कमिटीचे पदाधिकारी, मंडल काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, फ्रंटल व विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, संबंधित तालुकाध्यक्ष तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उमेदवार हे उपस्थित राहणार आहेत.

तरी सदर बैठकीस संबंधित मतदार संघातील प्रत्येक तालुकाध्यक्षांनी आपल्या तालुक्याची सर्व माहिती व पक्ष कार्यासाठी दोन दिवस देणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
काँग्रेस लोकसभेच्या दोन्ही जागा पूर्ण ताकदीने लढवणार:जिल्हाध्यक्षांचे प्रतिपादन काँग्रेस लोकसभेच्या दोन्ही जागा पूर्ण ताकदीने लढवणार:जिल्हाध्यक्षांचे प्रतिपादन Reviewed by Prashasak on ऑगस्ट ०९, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.