प्रशासक न्यूज,दि.१६फेब्रुवारी
आयुष्यात जर उत्तुंग यश गाठायचे असेल तर स्वप्नांना तितक्याच कठोर परिश्रमांची जोड देण्याबरोबरच आपल्या परिस्थितीचं भान असण आणि आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत शिवाजीराव नागवडे डेफोडील्स स्कूल व कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले गटशिक्षण अधिकारी अनिल शिंदे यांनी व्यक्त केले.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, दुय्यम निबंधक सचिन खताळ, तसेच पत्रकार विशाल चव्हाण,निरीक्षक एस.पी.गोलांडे, मुख्याध्यापिका दुलानी मॅडम आदी उपस्थित होते.अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रशांत दरेकर यांनी वेगवेगळे उदाहरण देत जिद्द,त्याग आणि कठोर परिश्रम हीच यशाची त्रिसूत्री असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.जीवन जगत असताना अपयश जरी आले तरी न थांबता यशासाठी प्रयत्न करत रहा, कारण कुठलेही यश अंतिम नसते आणि यशाला शेवटही नसतो असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी केले.
विद्यार्थ्यांनी केवळ गुणात्मक स्पर्धा करण्याऐवजी स्वतःतील क्षमता ओळखून भविष्यातील यशाच्या वाटा निवडाव्यात असे मत दुय्यम निबंधक सचिन खताळ यांनी मांडले.तर जीवनामध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान आणि जगामध्ये चाललेल्या इतर घडामोडी यांचे देखील ज्ञान असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पत्रकार विशाल चव्हाण यांनी मांडले.करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे ज्ञान प्राप्त व्हावे, प्रशासकीय अधिकाऱ्यांची यशोगाथा ऐकायला मिळावी यासाठी प्रशासकीय, कृषी, सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना समारंभास आमंत्रित केल्याचे निरीक्षक एस पी गोलांडे यांनी सांगितले.
यावेळी दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त करत यशस्वी होण्यासाठी दिलेल्या शैक्षणिक शिदोरीबद्दल शिक्षकांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा व मयंक मुथा यांच्यासह इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले. प्रास्ताविक प्रियंका नागवडे यांनी तर आभार प्रदर्शन शुभ्रा सारंगकर या विद्यार्थिनींनी केली.
उत्तुंग यशासाठी स्वप्नांना प्रयत्नांची जोड द्या - गटशिक्षण अधिकारी शिंदे
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १५, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी १५, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: