का करावी योग साधना? काय आहे योगाचे महत्व.. हे जाणून घ्या जागतिक योगदीनानिमित्त!


प्रशासक न्यूज,दि.२१जून२०२५

२१ जून हा पृथ्वीवराचा सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी सूर्याचे दक्षिणायान सुरु होते. योगविद्येत या दिवसाला विशेष महत्व आहे. त्यामुळे मानवाच्या सर्वांगिण विकासासाठी वरदान ठरणा-या योग साधनेची २१ जून हा दिवस 'जागतिक योग दिन' म्हणून घोषणा करण्यात आली आहे. भारताला योगाची प्राचीन परंपरा आहे. भारतानेच पाश्चात्य देशांना योग्य विद्या शिकवली. आज त्याचा प्रसार आणि प्रचार सर्व जगात होतो आहे.

योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा या सर्वांना ईश्वराशी जोडणे होय. योग म्हणजे बुध्दी, मन, भावना आणि संकल्प यांचे नियमन होय. योगात यम, नियम, आसान, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांना खूप महत्व आहे. योगाची व्याख्या जरी 'चित वृती निरोध' अशी केली तरी शरीर, इंद्रिये, मन, बुध्दी, अहंकार, चित्त, विवेकबुध्दी, यांना संस्कारीत करण्याची प्रक्रिया योगामुळे प्राप्त होते. योगामुळे मन प्रसन्न, आनंदी राहुन शरीर लवचिक, कार्यक्षम आणि निरोगी राहाते.

योग आणि प्राणायामामध्ये श्वासाला खूप महत्व आहे. मानवी फुफ्फुसात जवळ-जवळ ७ कोटी ३० लाख स्पंजासारखे कोष्टक असतात. योग आणि प्राणायामाशिवाय त्यांना पूर्ण प्राणवायु मिळत नाही. माणुस १ मिनिटाला १५ श्वास घेतो. कासव १ मिनिटाला फक्त ५ श्वास घेते म्हणून कासव ४०० वर्षे जगते. प्राणायाम व ध्यानाच्या सरावाने योगी ४ पर्यंत श्वाससंख्या आणु शकतो व तो योगी आपले आयुष्य ४०० वर्षापर्यंत प्राप्त करु शकतो. प्राणायाममध्ये श्वास आत घेणे-पुरक, श्वास आत रोखणे कुंभक, बाहेर सोडणे रचेक व श्वास बाहेर रोखणे याला बाह्य कुंभक म्हणतात.

निरोगी जीवन जगण्यासाठी नियमित सूर्यनमस्कार घालावेत. त्यात ८ आसनांचा अभ्यास होतो. या आसनाला आसनांचा राजा म्हटलेले आहे. निरोगी राहण्यासाठी मंभोचारासहीत किमान १२ सूर्यनमस्कार घालावेत. याचबरोबर उभे, बैठे, पाठीवरील व पोटावरील काही आसने करावीत. ज्यामुळे रक्ताभिसरण व शरीराचे चलनवलन चांगले राहील. म्हणूनच 'शरीर माध्यम खलु धर्म साधनम' असे म्हटले आहे. शरीर सुदृढ व निरोगी असेल तर मनात येणारा प्रत्येक विचार हा एक वेगळी उर्जाशक्ती घेऊनच बाहेर पडतो. मानवी शरीरात एकुण ७२ कोटी १० लाख १० हजार २१० नाड्या असतात. तसेच ३५० सांधे व ३७० हाडे असतात. मानवी शरीर बाहेरील औषधापेक्षा आंतरिक उर्जेमुळे अतिशय चांगले, स्वस्थ व ऊर्जावान बनते. आंतरिक शक्ती ही सर्व श्रेष्ठ शक्ती आहे. ती जागृत करण्यासाठी फक्त आणि फक्त श्वास नियंत्रण अति महत्वाचे आहे. यासाठी श्वास घेणे व सोडणे गती महत्वाची आहे. यात कुंभक, रचेक, दीर्घ श्वास घेणे व सोडणे.

जीवन सुदृढ होते श्वासाने. संपते श्वास बंद पडल्याने. श्वास अभ्यासामुळे जीवन, मन, शरीर, सर्व प्रकारचे आजार ठीक करता येतात. शारीरीक, मानसिक, बौध्दीक विकासासाठी वरील अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. प्रचंड ताकद या अभ्यासात आहे.

आज दर ५ माणसांमागे १ माणुस विविध आजाराने त्रस्त आहे त्यात बी.पी., मधुमेह, थॉयराईड, कॅन्सर, हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार, नेत्रविकार, सांधेदुखी, मणक्याचे आजार, मानसिक आजार इ.चा सामावेश होतो. तसेच तणाव पुर्ण जीवनशैली हेच अनेक व्याधींचे मुळ आहे.

योग्य आहार, व्यायाम आणि विश्रांती हीच खरी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्याच जोडीला सूर्यनमस्कार, विविध प्रकाराची आसने, मौन, ध्यान धारणा, प्रसन्न मन, आनंदी वृत्ती, निकोप आचार, विचार यांची खरी गरज आहे.

आजचे तरुण हेच खरे उद्याचे नागरिक आणि देशाचे आधार स्तंभ आहेत. त्यांच्यात योगाची आवड निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी शालेय स्तरावर योगा विषयाचा अभ्यासक्रमात सामावेश करावा. मगच ख-या अर्थाने जागतिक योगदिन साजरा केल्याचे सार्थक होईल असे मला वाटते.

श्री. राहिंज बी.के. (योगशिक्षक) श्रीगोंदा मो.नं. ९४०४९७६५६६








का करावी योग साधना? काय आहे योगाचे महत्व.. हे जाणून घ्या जागतिक योगदीनानिमित्त! का करावी योग साधना? काय आहे योगाचे महत्व.. हे जाणून घ्या जागतिक योगदीनानिमित्त! Reviewed by Prashasak on जून २१, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.