ग्रामदैवताच्या रथाचे सारथ्य करण्याचा बहुमान कर्नाटकच्या 'बाहुबली' ला!


प्रशासक न्यूज,दि.२२जून२०२५

श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत श्री संत शेख महंमद महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान २७ जून २०२५ रोजी श्रीगोंद्यातून महाराजांच्या समाधी मंदिरापासून सकाळी आठ वाजता होणार आहे.पालखी सोहळ्याचे हे तिसरे वर्ष असून उत्कृष्ट नियोजन,देहूच्या धर्तीवर तयार केलेला पालखी रथ, नामांकित खिलार बैल जोडी ,वारकऱ्यांचा प्रचंड सहभाग यामुळे महाराजांचा हा पालखी सोहळा संपूर्ण आषाढी वारीत दिवसेंदिवस लक्षवेधी ठरत आहे.

सद्गुगुरु श्री संत शेख महंमद महाराज हे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत होते. या दोन्ही संतांची पहिली भेट पंढरपूर मध्ये झाली होती.त्यामुळे या दोन्ही पालखी सोहळ्यांची भेट पंढरपूर मध्ये होते आणि एकत्र पादुका पूजन होते. सद्गुगुरु श्री संत शेख महंमद महाराजांनी संपूर्ण जीवनभर वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रचार प्रसार केला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा प्रचंड प्रभाव सद्गुगुरु श्री संत शेख महंमद महाराज यांनी लिहिलेल्या योगसंग्राम या ग्रंथामध्ये दिसून येतो.

देहू व आळंदीच्या धर्तीवर वारकरी संप्रदायातील नित्य नियम प्रथा परंपरा पाळत या पालखी सोहळ्याचे नियोजन केले जात आहे, मानाच्या इतर पालख्या प्रमाणेच चालू वर्षी पालखी रथाचे सर्वात पुढे चौघडा गाडी चालणार आहे,त्यानंतर ध्वज असलेले वारकरी,महाराजांचा अश्व,पुरुष वारकरी,विणेकरी,डोक्यावर तुळशी घेतलेल्या महिला वारकरी,पालखी सोहळा रथ,आणि त्यानंतर महिला वारकरी असा क्रम सोहळ्यात चालताना असणार आहे.पालखी सोहळ्याचे नियोजन व्यवस्थित व्हावे म्हणून चालू वर्षी सुद्धा २ महिन्यापासून यात्रा कमिटी,पालखी समिती,भाविक आणि ग्रामस्थांचे अनेक हात राबत आहेत.

चालू वर्षी श्री संत शेख महंमद महाराज यांचा पालखी रथ ओढण्याचा मान श्रीगोंद्याचे कृषी अधिकारी संदीप बोदगे यांच्या बैल जोडीला मिळाला आहे.मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात घटप्रभा ( कर्नाटक ) येथे भरलेल्या प्रदर्शन मधून खरेदी केलेला बाहुबली हा खिल्लार जातीचा प्रसिद्ध बैल या वर्षी महाराजांच्या पालखी रथाच्या बैलजोडी मध्ये असणार आहे.

पालखी रथ ओढण्यासाठी बाहुबली सह एकूण ४ बैल असून पालखी मुक्कामाचे प्रत्येक ठिकाणी बैलांची स्वतंत्र बांधण्याची व्यवस्था,बैलांची देखभाल,सजावट व सर्व व्यवस्थापनासाठी काही तरुणांची टीम कार्यरत असणार आहे असे बैलजोडी चे मानकरी संदीप बोदगे यांनी सांगितले..
ग्रामदैवताच्या रथाचे सारथ्य करण्याचा बहुमान कर्नाटकच्या 'बाहुबली' ला! ग्रामदैवताच्या रथाचे सारथ्य करण्याचा बहुमान कर्नाटकच्या 'बाहुबली' ला! Reviewed by Prashasak on जून २२, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.