प्रशासक न्यूज,दि.२६जुलै
दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच 26 जुलै रोजी भारतात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. 1999 मध्ये याच तारखेला भारतीय सैनिकांनी, पाकिस्तानी घुसखोरांनी ताब्यात घेतलेल्या सीमेवरील मोक्याच्या डोंगरावर यशस्वीरित्या पुन्हा कब्जा केला होता. या विजयामुळे अधिकृतपणे भारत-पाकिस्तान युद्ध संपुष्टात आलं होतं. हा विजय भारतीय सैन्यदलाच्या सदस्यांनी दाखवलेल्या शौर्याचा आणि दृढनिश्चयाचा पुरावा होता.
या संघर्षात मिळालेल्या विजयाचं स्मरण म्हणून कारगिल दिवस विशेष महत्त्वाचा आहे. भयंकर आणि प्रदीर्घ युद्धादरम्यान लढलेल्या भारतीय सैनिकांच्या धैर्याला आणि बलिदानाला आजच्या दिवशी आदरांजली अर्पण केली जाते. 'डीएनए'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
कारगिल युद्धात सर्वच सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावली होती. या पैकी चार असाधारण वीरांना त्यांच्या शौर्य आणि निस्वार्थ बलिदानासाठी 'परमवीर चक्र' हा भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चार शूरवीरांची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे.
1) परमवीर चक्र कॅप्टन विक्रम बत्रा : कॅप्टन विक्रम बत्रा हे भारतीय लष्करातील 13वी बटालियन असलेल्या 'जम्मू आणि काश्मीर रायफल्स'मध्ये अधिकारी होते. कारगिल युद्धादरम्यान त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवलं आणि द्रास सेक्टरमधील पॉइंट 5140 (ज्याला 'पॉइंट 4875' असं सांकेतिक नाव देण्यात आलं होतं) पुन्हा ताब्यात घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन त्यांच्या शौर्याचा देशानं गौरव केला. "ये दिल माँगे मोअर!" हा कोडवर्ड घेऊन लढणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांचा आत्मा आजही युद्धादरम्यान अनेकांना प्रेरणा देत आहे.
2) परमवीर चक्र लेफ्टनंट मनोज कुमार पांडे : लेफ्टनंट मनोज कुमार पांडे हे 1/11 गोरखा रायफल्समध्ये अधिकारी होते. बटालिक सेक्टरमधील खालुबरच्या लढाईत त्यांनी असाधारण शौर्य दाखवलं. त्यांनी आपल्या गटाचं नेतृत्व केलं आणि शत्रूची जागा काबीज केली. दुर्दैवाने युद्धादरम्यान त्यांना आपला जीव गमावावा लागला. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं.
3) परमवीर चक्र रायफलमॅन संजय कुमार : रायफलमॅन संजय कुमार हे कॅप्टन विक्रम बत्रा यांच्याप्रमाणेच 13वी बटालियन असलेल्या 'जम्मू आणि काश्मीर रायफल्स'चे सदस्य होते. युद्धादरम्यान शत्रूची मोक्याची जागा काबीज करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शत्रूच्या जोरदार गोळीबाराचा सामना करत त्यांनी आपल्या दृढनिश्चयानं आणि धैर्यानं 16 हजार फूट उंचीवरील एक महत्त्वपूर्ण पॉइंट ताब्यात घेतला. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना परमवीर चक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार देण्यात आला.
4) परमवीर चक्र ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव : ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव हे 18 ग्रेनेडियर्स रेजिमेंटचा भाग होते. कारगिल युद्धादरम्यान शत्रूच्या तीव्र प्रतिकाराला तोंड देत त्यांनी टायगर हिलवरील हल्ल्याचं नेतृत्व केलं. अनेकवेळा जखमी होऊनही, यादव यांनी विलक्षण शौर्य आणि नेतृत्व कौशल्य दाखवलं. वयाच्या 19 व्या वर्षी परमवीर चक्र सन्मान मिळवणारे ते पहिले सैनिक ठरले.
या चारही शूरवीरांनी शौर्य, नेतृत्व आणि आत्मत्याग या गुणांचं सर्वोत्तम उदाहरण प्रस्थापित केलं. कारगिल युद्धादरम्यान त्यांनी केलेली कामगिरी देशाच्या सतत स्मरणात राहील. परमवीर चक्र हा त्यांच्या विलक्षण धैर्याचा आणि देशासाठी दाखवलेल्या समर्पणाचा पुरावा आहे.
पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणाऱ्या 'त्या' चार शूरविरांची पराक्रमगाथा
Reviewed by Prashasak
on
जुलै २६, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
जुलै २६, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: