तीन शेतमजुरांचा विषारी द्रव पिल्याने मृत्यू


प्रशासक न्यूज,दि.२०ऑगस्ट

सांगली जिल्ह्यातील तीन शेतमजुरांचा आंध्रप्रदेशमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान नशेसाठी म्हणून अल्कोहोल मिश्रित विषारी द्रव पिल्याने तीन शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे घडली. हे तिघे तासगाव तालुक्यातील सावळज व सिद्धेवाडी येथील आहेत. सदाशिव सदाकळे (वय 43), दीपक जयसिंग शिरतोडे (वय 44, दोघे रा. सावळज) व भरत नामदेव चव्हाण (वय 42, रा. सिद्धे वाडी) अशी तिघांची नावे आहेत.

सांगलीचे तीन शेतमजूर आंध्रप्रदेशमधील एका द्राक्ष व्यापाऱ्याकडे कामासाठी होते. सदाशिव, दीपक व भरत हे तिघे शेतमजूर म्हणून काम करतात. अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे एका द्राक्ष व्यापाऱ्याकडे त्यांच्या शेतात बऱ्याच दिवसांपासून काम करतात. दरम्यान द्राक्ष व्यापाऱ्यांने त्यांना त्यांच्यासाठी निवाराही दिला होता. मागच्या दोन दिवसांपूर्वी तिघेही दारू पिण्यासाठी म्हणून अल्कोहोल मिश्रित विषारी द्रव पिले असल्याचे समजते. हे द्रव पिल्यानंतर काही तासात त्या तिघांची प्रकृती बिघडली.

शेतातील घरात त्या तिघांशिवाय कोणी नव्हते. त्यांची तब्येत बिघडू लागली. परंतु त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. या घटनेची माहिती मिळताच द्राक्ष व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी जावून पाहिले. त्यावेळी भरत चव्हाण यांचा मृत्यू झाला होता. इतर दोघांची प्रकृती गंभीर बनली होती. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला.

या घटनेची माहिती गुरुवारी रात्री उशिरा मृताच्या कुटुंबियांना समजली. एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्याने सावळज, सिद्धेवाडी परिसरात खळबळ उडाली. शुक्रवारी सकाळी या तिघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
तीन शेतमजुरांचा विषारी द्रव पिल्याने मृत्यू तीन शेतमजुरांचा विषारी द्रव पिल्याने मृत्यू Reviewed by Prashasak on ऑगस्ट १९, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.