प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी;जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


प्रशासक न्यूज,दि.२०ऑगस्ट

जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार सुनीता जराड उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यात या योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी 61 टक्के इतक्याच पात्र शेतकऱ्यांनी बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. 39 टक्के पात्र शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ई- केवायसी करून घ्यावी. मुदतीमध्ये ई-केवायसी प्रमाणिकरण न करणाऱ्या शेतकऱ्यांना जुलै 2022 नंतर या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागू शकते. याची संबंधित शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in. या वेबसाईटवरील Farmer Corner या टॅबमध्ये किंवा पी. एम. किसान ॲपद्वारे OTO द्वारे लाभार्थींना स्वत: ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रवार ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर 15 रुपये निश्चित करण्यात आला आहे. या सुविधांचा लाभ घेऊन पात्र शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 अखेरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान,अनेक वेळा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा प्रशासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते होते. परंतु अद्यापही 39 टक्के पात्र शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची केवायसी पूर्ण केलेली नाही. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाला मुकावे लागणार आहे. या योजनेत केंद्र सरकारकडून दरवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. दर चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतो.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी;जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी;जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन Reviewed by Prashasak on ऑगस्ट २०, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.